सोनई – प्रभू रामाचा १४ मिनिट लग्न मुहूर्त टळला म्हणून १४ वर्ष वनवास भोगावा लागला असल्याचे सोनई येथे राम कथेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सांगितले.
सोनईतील राम कथेचे वैशिष्ट्य म्हणजे संत महंतांची उपस्थिती, जगातील सर्वात मोठी श्रीमंती संस्कार असून सावत्र भावाचे प्रेम रामायणातच पहावयास मिळत असल्याचे सांगत
जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे रामायणात मिळतात व लग्नाचे खरे मुहूर्त घटी व गोरज असल्याचे महाराजांनी सांगितले.
काटीका वध, यज्ञ रक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम बिदाई, राम राज्याभिषेकाची तयारी, मंथरा पात्राचा उल्लेख, कैकयी व राजा दशरथ यांचा संवाद, वनवासात जात असतानाचा प्रसंग तसेच राम व भिल्ल केवटाच्या भेटीचे प्रसंगासह वर्णन केले.
कैकयीने दशरथ राजा कडून मागितलेल्या दोन वरा च्या पूर्ततेसाठी अयोध्येचे राज्य भरताला व रामाला १४ वर्षे वनवास मागितला दशरथ रूपी काम, कैकयी रुपी क्रोध व मंथरेचा लोभ अशा एकत्रीकरणाने रामराज्य १४ वर्षे लांबल्याचे सांगितले. प्रभू रामचंद्राचा जन्म कौसल्या पासून झाला असला तरी रामायणाचा जन्म कैकयी पासून झाल्याचा उल्लेख केला.
कुटुंबातील सासु -सुने विषयी सांगताना सुनेने सासूला आई समजावे तर सासुने सुनेला मुलगी समजले तर कुठलीही सासू वृद्धाश्रमात जाणार नाही यासाठी ही राम कथा ऐकायची आहे असे सांगत आपल्या जीवनातील प्रश्नांसाठी व आचरणासाठी रामायण असल्याचा उल्लेख केला.
राम कथेला आलेल्या श्रोत्यां विषयी महाराजांनी सांगितले की आम्हाला इतर ठिकाणी भाविकांना टाळ्या वाजवायचे सांगावे लागतात परंतु सोनई येथील भाविकांना आता “टाळ्या वाजवणे थांबवा” असं म्हणावं लागतं म्हणजेच सोनईचे श्रोते हे सोन्यासारखी आहेत.
केवट कथेसाठी ह भ प सुनील गिरी महाराज, विष्णू महाराज पिठोरे, अतुल महाराज आदमने, संजय महाराज सरोदे, रामनाथ महाराज पवार, नंदकिशोर महाराज चव्हाण, चंद्रभान महाराज म्हसलेकर, घोडेगाव चर्चचे धर्मगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने महाराज मंडळी व भाविक वर्ग उपस्थित होते.
– लग्न मुहूर्त –
लग्न मुहूर्त वेळ हि वराती मुळे टळत असल्याने त्यासाठी गावोगावी एकत्र येऊन ‘दंडुके मंडळ’ तयार करावे व लग्न मुहूर्त वेळेतच होण्यासाठी दंडुके मंडळांनी प्रयत्न करावा असे कळकळीचे आवाहन महाराजांनी व्यक्त केले.
गर्दी – दर्दी
रामायण कथा सोहळ्यासाठी सोनई व तालुक्यातील भाविकांची संख्या दररोज वाढत असून सोनई राम कथेला नुसती ‘गर्दी’ नाही तर येथील भाविक ‘दर्दी’ असुन यामुळेच कार्यक्रमाला भव्यता लाभत असल्याचे ढोक महाराजांनी सांगितले.