श्रीरामपुर : शासनाने सोयाबीनला 4 हजार 892 रुपये हमीभाव जाहीर केला आहे, सध्या मात्र बाजारात चार हजार ते चार हजार चारशे रुपये पर्यंत सोयाबीन विक्री होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली होती. या अडचणीच्या काळात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून राज्यात हमीभावानुसार सोयाबीन खरेदी सुरू झालेली आहे. महाकीसान संघ राज्यातील नोडल एजन्सी म्हणून जाहीर झाल्यानंतर प्राधान्याने श्रीरामपूर येथे सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे.
ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावानुसार सोयाबीन विक्री करता येणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी आधारकार्ड, सोयाबीन नोंद असलेला सात बारा उतारा, बँक पास बुक घेऊन ग्रीनअप कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.
या खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवारी पार पडला. यावेळी प्रथम नोंद करणारे शेतकरी म्हणून माळवाडगाव येथील भाऊसाहेब नेमाने या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पहिल्याच दिवशी 230 शेतकऱ्यांनी नोंद केल्याची माहिती ग्रीनअपचे व्यवस्थापक किरण कदम यांनी दिली. तर शेतकरी हितासाठी महाकीसान संघ सदैव प्रयत्नशील असून आगामी काळात सोयाबीन खरेदीसह कांदा पावडर व इतर अनेक व्यावसायिक उपक्रम सुरू रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असल्याची माहिती नोडल संस्था असलेल्या महाकीसान संघाचे चेअरमन प्रशांत लोखंडे यांनी दिली.
यावेळी ग्रीनअप कंपनीचे चेअरमन अनिल हापसे, ग्रीनअपचे कार्यकारी संचालक सचिन ठुबे, गणेश मुदगुले, मंगेश खरपस, शुभम वाघ, राजेंद्र गवारे, नितीन गवारे, अशोक पवार यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी ग्रीनअप कार्यालय (मो.8805821332) यांच्याशी संपर्क साधावा. आप्पासाहेब ढोकने यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन ठुबे यांनी प्रस्तावित केले, राजेंद्र गवारे यांनी आभार मानले.