Home अहमदनगर जनतेच्या आग्रहास्तव उमेदवारी – कर्डिले

जनतेच्या आग्रहास्तव उमेदवारी – कर्डिले

14
0

 

नगर : विधानसभेची यंदाची निवडणूक न लढवण्याचा माझा विचार होता. परंतु मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रेम व आग्रहास्तव मी पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनांची ते पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे जनतेच्या पदरी निराशा पडली. ही निराशा दूर करण्यासाठी मी मोठा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरलो आहे. आज या सभेला झालेली विक्रमी गर्दी पाहता मला वाटते ही निकालानंतरची विजयी सभाच आहे. मी मंजूर करून आणलेली अनेक विकासकामे बंद पाडणाऱ्या विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदानातून धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले

.

राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मंगळवारी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी राहुरी शहरातून भव्य रॅली काढली. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करीत राहुरीकरांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विक्रम तांबे, सुभाष गायकवाड, विनायक देशमुख, युवा नेते अक्षय कर्डिले, राजू शेटे, माजी सभापती संभाजी पालवे, धनंजय गाडे,भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, भास्कर गाडे,सुरेंद्र थोरात आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्डिले यांनी आपल्या भाषणात विद्यमान लोकप्रतिनिधी प्राजक्त तनपुरे यांचा नाव न घेता चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, माझ्याकडे कुठलाही कारखाना, शैक्षणिक संस्था नाही.आमदार नसतानाही जनता माझ्याकडे व्यक्तिगत तसेच विकासाची कामे घेऊन येते. त्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवण्याचे काम मी करीत असतो. तीस वर्षांपासून विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली असल्यामुळे माझा विजय आजच निश्चित झाला आहे. मी मंजूर केलेल्या विकासाच्या योजना बंद पाडण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षात केले आहे. राहुरी शहराची पाणीपुरवठा योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेतली होती. त्याचे श्रेय मला मिळू नये म्हणून ते मंत्री झाल्यानंतर ही योजना बंद करण्याचे काम त्यांनी केले. राहुरी शहरात आरोग्याचे केंद्र उभे राहावे यासाठी पालकमंत्री यांनी निधी उपलब्ध करून दिला. मात्र त्यांनी ते कामही मला श्रेय मिळेल म्हणून बंद पाडले. महायुती सरकारच्या काळात विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले आहे.

अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील शिवाजीराव कर्डिले यांनी गेली 30 वर्षे कुटुंबाकडे अक्षरश: दुर्लक्ष करून समाजासाठी, सर्वसामान्यांसाठी झटून काम केले. मी आज 28 वर्षाचा झालो. मात्र त्यांनी मला कधीही वेळ दिला नाही. त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले. त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले. जनतेने देखील त्यांच्यावर खूप प्रेम केले. तरी देखील मागच्या निवडणुकीत आमचा पराभव झाला. त्यावेळी आमच्याकडून काही हलगर्जीपणा झाला. शिवाजीराव कर्डिले हे जनतेला नेहमीच हक्काचा आधार वाटतो. त्यामुळेच भाजपाच्या पहिल्या यादीत माझ्या वडिलांचे नाव उमेदवारीसाठी घोषित झाले. आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले असे ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here