राहुरी – बुऱ्हाणनगर येथे प्रचारादरम्यान गेलो असता बाजारामधे लोकांना नमस्कार करून गाडीत बसलो. आमची गाडी पुढे जात असताना आमच्या ताफ्यातील काही गाड्यांसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या जमावाने हातात भाजपाचे झेंडे घेऊन आमच्या गाड्यात झेंडे टाकण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खळबजनक आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार तनपुरे बोलत होते..लोकशाही मार्गाने निवडणूक आपल्याला जिंकता येत नसल्याचे त्यांना वाटल्याने त्यांनी आता दडपशाही करणे सुरू केले आहे. लोकांना घाबरून दहशत करून निवडणूक जिंकता येईल असे त्यांना वाटते मात्र आता दडपशाहीला कुणी घाबरणार नाही. असा प्रकार झाल्यानंतर राहुरी तालुक्यातील आमचे कार्यकर्ते देखील म्हणाले की, आम्ही देखील त्यांच्या रॅली अडवतो त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतो मात्र आम्ही सर्व कार्यकर्त्यांना संयमी राहण्याचे आवाहन केले आहे. समोरचे चुकीचे वागले म्हणून आपण चुकीचे वागणार नाही. लोकशाही पद्धतीने आपण ही निवडणूक लढणार आणि जिंकणार आहोत असा विश्वास यावेळी तनपुरे यांनी व्यक्त केला.