Home अहमदनगर
102
0

सोनई – यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या यंदाचे कृतज्ञता पुरस्कार प्रसिद्ध सह्याद्री फार्मसचे विलास शिंदे, तसेच अहमदनगर ‘स्नेहालय’चे डॉ.गिरीश कुलकर्णी व ‘माऊली सेवा’चे डॉ.राजेंद्र धामणे या दोन डॉक्टर दांपत्याना जाहीर झाले आहेत. येत्या दि.21 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक माजी मंत्री व आमदार शंकरराव गडाख पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील सामाजिक क्षेत्रात रचनात्मक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. राज्यातील मोजक्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्ये याचा समावेश होतो. सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज्येष्ठ साहित्यिक मा खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे.

कृतज्ञता पुरस्काराचे मानकरी
नाशिक येथील पारंपारीक एकत्र शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विलास विष्णू शिंदे यांनी बारावीनंतर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी (एम.टेक.) अभ्यासक्रम विशेष प्रविण्यासह पूर्ण केला. घरच्यांचा शेती करण्यास असलेला विरोध डावलून त्यांनी शेती हाच मुख्य व्यवसाय निवडून सुरुवात केली. शेतीला जोड धंदा म्हणून काही जणांना सोबत घेऊन दूध डेअरी सुरू केली. परंतु यातून आलेल्या अपयशातून न डगमगता त्यांनी मे.विलास विष्णू शिंदे या वैयक्तिक नावाने प्रोप्रायटरी फर्म सुरू करून बंद पडलेल्या डेअरी फार्म व गायी, म्हशीच्या गोठ्याचे पॅक हाऊसमध्ये रुपांतर केले. द्राक्ष उत्पादक शेतकरी सोबत घेऊन 2004 मध्ये आडगावमधून द्राक्ष निर्यातीस सुरुवात करत पहिल्याच प्रयत्नात तब्बल 4 कंटेनर पाठवले. द्राक्षासोबत केळी, आंबा, डाळींब आदी फळे व भाजीपाला पिकांची निर्यात करण्याबरोबरच छोट्या जागेत प्रक्रिया उद्योग सुरू केला. पुढे 2010-11 मध्ये सर्व शेतकऱ्यांचे एकत्रित व्यावसायिक मॉडेल म्हणून त्यांनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. हॉर्टीकल्चर पिकांमध्ये शेवटपर्यंत मुल्यसाखळी प्रस्थापित करण्याचा विलास शिंदे यांचा प्रयत्न आहे.

डॉ.गिरीश कुलकर्णी राज्यशास्त्रात विद्यावाचस्पती असून कायदा – व्यवस्थापन – पत्रकारिता – इत्यादी विषयातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आहे. नगरच्या लालबत्ती भागातील महिला आणि बालकांच्या दारुण अवस्थेतून प्रेरणा घेऊन त्यांनी स्नेहालय संस्थेची 1989 मध्ये स्थापना केली. प्रचंड गैरसमज तसेच भीतीच्या काळात 1992 साली त्यांनी स्वतःच्या घरात लालबत्ती भागातील एच आय व्ही ग्रस्त बालके आणि शोषित महिलांना आणून त्यांना कुटुंबाचे घटक बनवून कार्याची सुरुवात केली. एड्स बाधितांसाठीचा भारतातील पहिला निवासी पुनर्वसन प्रकल्प नगरच्या औद्योगिक वसाहतीत स्नेहालयच्या माध्यमातून त्यांनी सुरू केला. त्यांना या कार्यात मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी स्नेहालयच्या उभारणीत मूल्यात्मक योगदान दिले असून स्नेहालयला मातृहृदयी करण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांनी १९९८ मध्ये “माऊली सेवा प्रतिष्ठान” या संस्थेची स्थापना केली. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ तसेच श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांवरील अगाध श्रद्धेतून त्यांनी संस्थेला “माऊली” नाव दिलं. सुरुवातीला माऊली सेवा प्रतिष्ठान संस्थेतर्फ़े छोटी मोठी शिबिरं भरवणे, एक मोबाइल क्लिनिक चालवणे असे काही किरकोळ प्रकल्प चालवत होते. या मोबाइल क्लिनिकमधून गावोगावी जाऊन डॉ.धामणे दाम्पत्य गोरगरिबांवर मोफ़त औषधोपचार करत असत. रस्त्यावर विमनस्क बकाल अवस्थेत फिरणाऱ्या निराधारांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे पवित्र कार्य डॉ.धामणे दाम्पत्य करत आहे.

विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या अशा मान्यवरांच्या आयुष्याचा प्रवास हा जिद्दीचा व सातत्याचा असतो म्हणूनच तरुणांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाचा लाभ व प्रेरणा घ्यावी असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ. शंकरराव गडाख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here