Home महाराष्ट्र शनिशिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी!

शनिशिंगणापूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी!

2
0

शनिशिंगणापूर गणराज्य न्यूज| प्रतिनिधी
शनिशिंगणापूर : शनि अमावस्येच्या पर्वकाळात लाखो शनिभक्तांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रात्री अमावस्येला सुरुवात झाल्यानंतर मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग कायम होती. गर्दीचे प्रमाण, भाविकांची गैरसोय आणि उन्हाचा त्रास या आव्हानांवर मात करण्यासाठी शनैश्वर देवस्थान प्रशासनाने केलेले नियोजन यंदा विशेष चर्चेचा विषय ठरले.

उत्कृष्ट दर्शन व्यवस्था आणि विविध सुविधांबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

दुष्काळाचे सावट, पितृपक्षातील शेवटचा दिवस आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीची पार्श्वभूमी असतानाही शनिभक्तांनी दर्शनासाठी मोठी उपस्थिती लावली. मात्र, गर्दीच्या प्रमाणापेक्षा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचीच अधिक चर्चा झाली. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या होत्या.

उन्हापासून संरक्षणासाठी विशेष उपाययोजना
मंदिर परिसरात उन्हापासून भाविकांचे संरक्षण करण्यासाठी वॉटर फॉगर्स बसविण्यात आले होते. उन्हामुळे फरशी गरम होऊन भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी फरशीवर पांढऱ्या रंगाचे कूल पेंट लावण्यात आले होते. त्यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना दिलासा मिळाला.

तेल अर्पणासाठी पर्यायी व्यवस्था
शनिमहाराजांच्या चौथऱ्यासमोर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी महाद्वारासमोरील दोन्ही बाजूंना तेल अर्पण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मुख्य पार्किंगमधील प्रवेशद्वार क्रमांक १ समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. या मंडपामध्ये स्वतंत्र दर्शनरांग तयार करण्यात आली होती. तसेच व्हीआयपी दर्शन आणि अभिषेक कक्षासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

भाविकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध व्हावी, त्यांच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी याच ठिकाणी चौकशी व मदत केंद्रही सुरू करण्यात आले होते.

तिन्ही प्रमुख मार्गांवर पार्किंगचे नियोजन
शनिशिंगणापूरकडे येणाऱ्या तिन्ही प्रमुख मार्गांवर वाहनतळांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यास आणि भाविकांची गैरसोय कमी करण्यास मदत झाली.

“शनि अमावस्या पर्वकाळातील नियोजनासाठी शनिशिंगणापूरचे ग्रामस्थ, व्यावसायिक आणि देवस्थानचे कर्मचारी यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या. दर्शन व्यवस्थेबाबत भाविकांनीही आपल्या सूचना द्याव्यात. भविष्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक चांगले नियोजन करण्यासाठी या सूचनांची मदत होईल,” असे आवाहन शनैश्वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी केले.

ते गणराज्य न्यूजशी बोलताना म्हणाले की, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे आणि संपूर्ण व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.
नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे भाविकांना दिलासा
शनि अमावस्येसारख्या महत्त्वाच्या पर्वकाळात लाखो भाविकांची गर्दी हाताळताना दर्शन व्यवस्था, वाहनतळ, उन्हापासून संरक्षण आणि मदत केंद्र अशा विविध बाबींवर भर देण्यात आला. देवस्थान प्रशासनाच्या या नियोजनामुळे भाविकांना अधिक सोयीस्कर दर्शनाचा अनुभव मिळाला. भविष्यातील मोठ्या धार्मिक सोहळ्यांच्या नियोजनासाठीही ही व्यवस्था उपयुक्त ठरणार असल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here