ब्राम्हणी | गणराज्य न्यूज प्रतिनिधी
एकीकडे पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची उघडपणे नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेवासा तालुक्यातील सोनई–करजगाव पाणी योजनेची पाइपलाइन राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी बसस्थानक परिसरात लिक झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून वाया जात आहे. विशेष म्हणजे, ब्राम्हणी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक थेंब पाण्याचे महत्त्व असताना, अशा प्रकारे हजारो लिटर पाणी वाया जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. एका बाजूला नागरिकांना पाण्यासाठी नियोजन आणि काटकसर करावी लागत असताना दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनमधून पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून पाइपलाइन लिकेज असूनही अद्याप दुरुस्ती का करण्यात आली नाही? पाणी योजना समिती आणि संबंधित अधिकारी नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
यापूर्वीच मुळा धरणातील पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पाइपलाइनमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यात संबंधित यंत्रणेला अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाणी हेच जीवन असताना त्याची अशी उघडपणे होणारी नासाडी कोणाच्या निष्काळजीपणामुळे सुरू आहे? दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या गळतीची जबाबदारी कोण घेणार? संबंधित पाणी योजना समिती व अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन पाइपलाइनची दुरुस्ती करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.










