अहिल्यानगर | प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४ हजार रुपये भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. ऊस दराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला असंतोष, कारखानदारांच्या भूमिकेविरोधातील नाराजी आणि आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने दिलेला एल्गार यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. अखेर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे तूर्तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार निलेश लंके, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिवसेना शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे, अनिल इंगळे, अभिजीत पोटे, संजय मोकाटे आदींसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोमवारी सकाळी १२ वाजता महानगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलन मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हातात संघटनेचे झेंडे, फलक आणि ऊस दरवाढीच्या मागणीचे संदेश घेऊन हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. ‘ऊसाला चार हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम द्या’, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांच्या एकजुटीचे आणि आक्रमक भूमिकेचे दर्शन यावेळी घडले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या भाषणातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, वाढता उत्पादन खर्च, खतांच्या व औषधांच्या वाढलेल्या किमती, मजुरी, वाहतूक खर्च आणि शेतीपुढील आर्थिक संकटाचा पाढाच वाचला. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि घामाचा योग्य मोबदला द्यावा, केवळ गाळप करून नफा कमावण्यापेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. चार हजार रुपये प्रतिटन ऊसदराची मागणी ही केवळ संघटनेची मागणी नसून ती जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काची मागणी असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर गुरुवारच्या बैठकीकडे लक्ष!
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान मंगळवारपासून साखर कारखाने बंद ठेवण्याची भूमिका शेतकरी संघटनेने मांडली. तसेच गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांची बैठक बोलावून ऊसदराच्या प्रश्नावर ठोस चर्चा करण्यात येईल आणि अंतिम निर्णय घेण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकरी संघटनेला लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर सध्या सुरू असलेले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय होणार?
ऊसदराचा प्रश्न केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी जोडलेला आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना ऊसाला अपेक्षित दर मिळणे अत्यंत गरजेचे असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत कारखानदार कोणती भूमिका घेतात आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मागणीवर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आंदोलन स्थगित झाले असले तरी ऊसदराचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यामुळे गुरुवारची बैठक शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून चार हजार रुपये प्रतिटन दराच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होतो का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.














