Home Blog कनगर यात्रा उत्सव उत्साहात सुरू

कनगर यात्रा उत्सव उत्साहात सुरू

2
0

गणराज्य न्यूज राहुरी : ​महाराष्ट्राच्या मातीचं एक देखणं वैशिष्ट्य आहे. इथं धर्म, आध्यात्म, लोककला आणि शेतीमातीचं जगणं हे वेगवेगळे कप्पे नसतात; ते एकाच कापडाचे ताणेबाणे असतात.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वसलेलं कणगर हे गाव याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रवरा-मुळा खोऱ्यातील या सुपीक भूमीत केवळ ऊस आणि सोनं पिकत नाही, तर इथं प्राचीन परंपरांची आणि लोकसंस्कृतीची मशागतही तितक्याच निष्ठेने केली जाते. या गावाचा श्वास आणि पंचक्रोशीचं मुख्य श्रद्धास्थान म्हणजे ग्रामदैवत ‘श्री कनकावती देवी’. दरवर्षी कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला देवीचा वार्षिक यात्रा उत्सव सुरू होतो, तेव्हा या मातीच्या कणाकणांत एक वेगळाच चैतन्यसोहळा नांदू लागतो.

‘कनकनगरी’ ते ‘कणगर’ : एक गौरवशाली इतिहास
कणगर गावाच्या नावामागे एक मोठा आध्यात्मिक आणि साहित्यिक वारसा दडलेला आहे. मालू नरहरी लिखित ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथात (अध्याय ६ ते ८) ‘कनकनगरी’ या प्राचीन नगरीचा स्पष्ट उल्लेख येतो. याच पावन भूमीत गुरुभक्तीचा सर्वोच्च आदर्श घडला होता—जेव्हा मच्छिंद्रनाथांच्या इच्छेखातर उडदाच्या वड्यांसाठी शिष्य गोरक्षनाथांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा डोळा काढून दिला होता. इतकंच नव्हे, तर नवनाथांपैकी एक थोर नाथ श्री गहिनीनाथ यांचा जन्मही याच कनकनगरीत झाला.

​अहिल्यानगर जिल्हा ही नाथ संप्रदायाची मुख्य कर्मभूमी. काळाच्या ओघात या प्राचीन ‘कनकनगरी’ या नावाचा अपभ्रंश होऊन ‘कणगर’ हे नाव रूढ झालं. नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कनकनगरीची रक्षणकर्ती आणि अधिष्ठात्री देवता म्हणून आदिशक्तीला ‘कनकावती’ हे नाव प्राप्त झालं. गाभाऱ्यातील देवीची तेजस्वी, शेंदूरचर्चित मूर्ती पाहिली की, ही केवळ दगडाची मूर्ती नाही, तर ती या गावाच्या सुख-दुःखाची साक्षीदार आहे, याची जाणीव होते.

वारकरी संप्रदायाचा ‘अखंड हरिनाम सप्ताह’
कणगरच्या या देवीच्या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शैव, शाक्त आणि वैष्णव परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या दरबारात महाराष्ट्राच्या लाडक्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून ‘अखंड हरिनाम सप्ताह’ आयोजित केला जातो. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिपाठाच्या सुरांत आणि कीर्तनाच्या माध्यमातून होणारं प्रबोधन गावाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची देऊन जातं. ही केवल कर्मकांडाची पूजा नसते, तर तो विठुरायाच्या भक्तीचा आणि आदिशक्तीच्या जागराचा एक अनोखा मेळ असतो.

त्रिपुरारी पौर्णिमा : दीपोत्सव आणि लोककलांचा महाकुंभ
नवरात्रातील या आध्यात्मिक पर्वानंतर गावाला वेध लागतात ते कार्तिक महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेचे. हा दिवस म्हणजे कणगरकरांसाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण!
​प्रकाशाचा उत्सव: त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांच्या उजेडात न्हाऊन निघतो आणि आसमंत प्रकाशाने उजळून निघतो. रात्री देवीची फुलांनी सजवलेली पालखी आणि छबिना मिरवणूक निघते. या मिरवणुकीत होणारी शोभेच्या दारूकामाची भव्य आतिषबाजी आकाशात जणू नक्षत्रांची बरसात करते.

लोककलावंतांच्या हाजऱ्या आणि तमाशा:
महाराष्ट्राची अस्सल लोककला जिवंत ठेवण्याचं काम कणगरच्या यात्रेने आजवर केलं आहे. देवीच्या चरणी सेवा म्हणून लोककलावंतांच्या हाजऱ्या लागतात. रात्रीच्या शांततेत ढोलकीची थाप आणि तुणतुण्याचा झंकार घुमू लागतो. महाराष्ट्राचं अस्सल लोकनाट्य अर्थात ‘तमाशा’ यात्रेची रंगत वाढवतो.

कुस्त्यांचा जंगी हंगामा:
दुसऱ्या दिवशी गावातील लाल मातीचा आखाडा सज्ज होतो. पंचक्रोशीतील नामांकित मल्लांचे शड्डू घुमतात आणि कुस्त्यांचा जंगी हंगामा रंगतो. रांगड्या मातीतील हा मर्दानी खेळ पाहण्यासाठी पंचक्रोशी लोटते.

माहेरवाशिणींचा ओढा आणि सामाजिक एकोपा
यात्रेनिमित्त नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेली माणसं आणि सासरी गेलेल्या लेकी-बाळी (माहेरवाशिणी) पूर्वी कधीतरी गाव सोडून दुसरीकडे गेलेली कुटुंब कणगरच्या वाटेला लागतात. हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित राहत नाही; तर तो गावातील माणसांना जोडणारा एक मजबूत धागा ठरतो. जात-पात, मतभेद विसरून अख्खं गाव ‘कनकावती मातेचा उदो उदो’ म्हणत एकाच छताखाली येतं.

​आजच्या वेगवान आणि काहीशा तुटत चाललेल्या काळात कणगरकरांनी जपलेला हा वारसा मोलाचा आहे. नाथांची परंपरा, वारकऱ्यांचा हरिनाम सप्ताह, तमाशातील लोककला आणि कुस्त्यांचा आखाडा—या सगळ्यांतून कणगरची कनकावती देवी आजही या मातीला आणि माणसाला जगण्याचं बळ देत आहे!

शब्दांकन : राजेंद्र सोंडे
लेख संपर्क : शिवाजीराव घाडगे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here