अहिल्यानगर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस दराच्या संघर्षाला आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उसाला एकूण ३ हजार ४५० रुपये दर देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती समजते.
या निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३ हजार २५० रुपये देण्यात येणार आहेत. त्यानंतर दिवाळीच्या सणाला प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त दिले जाणार असून, साखरेचा बाजारभाव स्थिर राहिल्यास आणखी १०० रुपये देण्याचे बैठकीत निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना एकूण प्रतिटन ३ हजार ४५० रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अनेक ठिकाणी ऊसतोड बंद पाडणे, ऊस वाहतूक करणारी वाहने अडविणे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अशा माध्यमांतून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, उत्पादन खर्चाचा विचार करून दर निश्चित करावा आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवावी, अशी मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर ३२५० रुपयांची पहिली उचल आणि टप्प्याटप्प्याने आणखी २०० रुपये देण्याच्या निर्णयाची माहिती समोर आली आहे. मात्र, जाहीर झालेला दर शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देणारा आहे का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
शेतकरी संघटना निर्णय मान्य करणार की आंदोलनाचे हत्यार उपसणार?
बैठकीतील निर्णयानंतर आता शेतकरी संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जाहीर झालेला ३४५० रुपयांचा दर शेतकऱ्यांना मान्य होणार का? पहिल्या उचलीसह पुढील दोन टप्प्यांतील रक्कम देण्याच्या अटींवर संघटना समाधानी होणार का? की आणखी दरवाढीसाठी आंदोलन सुरूच ठेवणार, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे कारखानदारांची आर्थिक गणिते, साखरेचे बाजारभाव आणि उत्पादन खर्चाचे आव्हान असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीतील निर्णय हा ऊस दराच्या संघर्षातील निर्णायक टप्पा ठरणार की आंदोलनाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
आता सर्वांचे लक्ष शेतकरी संघटनांच्या अधिकृत भूमिकेकडे!









