Home महाराष्ट्र ब्राह्मणीत ऊस वाहतुकीचे ट्रक अडवले

ब्राह्मणीत ऊस वाहतुकीचे ट्रक अडवले

2
0

ब्राह्मणी | प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य व समाधानकारक भाव मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट उसाच्या शेतात जाऊन सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रक व वाहने अडवून वाहतूक बंद ठेवण्याची समज देण्यात आली. ऊस दरवाढीचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत ऊसतोड आणि वाहतूक सुरू करू नये, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने परिसरात ऊस दर आंदोलनाचा जोर वाढला आहे.

सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाने लेखी आश्वासन देत कारखानदारांसोबत बैठक घेण्याचे निश्चित केले होते. तसेच ऊस दराबाबत समाधानकारक निर्णय होईपर्यंत गाळप सुरू ठेवण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाने कारखानदारांना सूचना द्याव्यात, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने आंदोलनाची पुढील दिशा ठरवली असून, प्रत्येक साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी त्यांनीही सहकार्य करावे, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे ब्राह्मणी परिसरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून ऊसतोड बंद करण्याची भूमिका घेतली आहे.

गौरी आणि ओंकार शुगरचे आभार; ३७०० रुपयांचा भाव जाहीर
दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील गौरी शुगर आणि देवदैठण येथील ओंकार शुगर या साखर कारखान्यांनी प्रतिटन ३७०० रुपये ऊसदर जाहीर करून ऊस दराच्या कोंडीला काही प्रमाणात वाट मोकळी करून दिली आहे. या दोन्ही कारखान्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे ब्राह्मणी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, कारखाना व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

इतर कारखानदारांनीही शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून योग्य ऊसदर जाहीर करावा. ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, खते, औषधे, मजुरी, पाणी, वीज आणि मशागतीचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

बैठकीची तारीख पे तारीख; प्रशासनाच्या भूमिकेवर शेतकऱ्यांची नाराजी!
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान प्रशासनाने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी कारखानदारांसोबत बैठक घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आता ही बैठक शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी होणार असल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर असताना वारंवार बैठकीच्या तारखा पुढे ढकलल्या जात असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जात आहे. एका दिवसाची मुदतवाढ म्हणजे केवळ तारीख बदलणे नसून त्याचा परिणाम ऊसतोड कामगार, वाहतूकदार, ट्रकचालक, कारखानदार आणि सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाने वेळकाढूपणा न करता बैठकीत ठोस निर्णय घ्यावा. केवळ आश्वासने आणि बैठकांच्या तारखा न देता ऊस दराबाबत अंतिम निर्णय जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

शुक्रवारच्या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष!
शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ऊस दराचा प्रश्न मार्गी लागणार की पुन्हा आश्वासनांचेच गाजर दाखवले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गौरी शुगर आणि ओंकार शुगर यांनी जाहीर केलेल्या ३७०० रुपये प्रतिटन दराच्या पार्श्वभूमीवर इतर कारखानदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र स्वरूपात छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय रामदास मोकाटे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, ऊस उत्पादकांच्या एकजुटीपुढे अन्यायकारक दर झुकलाच पाहिजे, अशी भूमिका घेत ब्राह्मणी परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे शुक्रवारची बैठक ऊस दर आंदोलनाच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here