गणराज्य न्यूज : राहुरी भाजप संघटनेच्या माध्यमातून राहुरी विधानसभा मतदारसंघात चांगले काम सुरू आहे.त्याचे मतात रूपांतर झाले पाहिजे. राज्यात सत्ता आणायची आहे. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला सुधारावी. भाजपचा आमदार निवडून द्यावा. असे आवाहन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले
राहुरी येथे शनिवार 31 ऑगस्ट रोजी भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला.यावेळी केंद्रीय मंत्री खडसे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले होते. भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील भाजपाच्या कार्याचा व कामाचा आढावा मांडला. याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठल लंघे, सत्यजित कदम, अक्षय कर्डिले, अमोल भनगडे, काशिनाथ लवांडे, तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, सूरसिंग पवार, रवींद्र म्हसे, उत्तम आढाव, उत्तम म्हसे, शिवाजी गाडे, महेंद्र तांबे,शामराव निमसे, मंदा डुक्रे, मीरा घाडगे, मंगल निमसे, अर्जुन पानसंबळ, रभाजी सूळ, पुरुषोत्तम आठरे, एकनाथ आटकर, संतोष म्हस्के, विजयराव बानकर उपस्थित होते.
खडसे म्हणाल्या, “नगर जिल्ह्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांचे यांचे मोठे काम आहे. राज्यातील खासदारांमध्ये सर्वाधिक विकासकामे डॉ. विखे यांनी मतदारसंघात केली. त्यांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा देशभरात सर्वात जास्त लाभ नगर जिल्ह्याला मिळवून दिला. एक वेळ माझी उमेदवारी निश्चित नव्हती. परंतु डॉ. विखे यांची उमेदवारी व विजय निश्चित मानला जात होता. त्यांचा पराभव धक्कादायक ठरला.”
“कार्यकर्त्यांनी मतदार यादी व्यवस्थित पाहून घ्यावी. लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आता लाभार्थ्यांचे फॉर्म भरीत आहेत. त्याची मतदारांना माहिती द्यावी. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. पक्षातील मतभेद बाजूला ठेवावे. पक्ष विचार धारेबरोबर काम करावे. लोकसभेची चूक विधानसभेला सुधारावी.” असेही खडसे यांनी सांगितले.
माजी खासदार डॉ. विखे म्हणाले, “लोकसभा मतदारसंघात वयोश्री योजना, धार्मिक तीर्थाटन, महिलांना सांस्कृतिक कार्यक्रम असे सर्वकाही केले. तरी पराभव झाला. निवडणूक कोणत्या मुद्द्यावर व निकषावर होते, हेच समजत नाही. आम्ही पळत होतो, लोक ऐकत नव्हते. असे सांगणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे गाव नाही. असे समजावे. त्यांच्या जागी दुसरा कार्यकर्ता तयार करावा.”
“कुणाला दुखवू नका. कोण कुणाबरोबर जातो, त्याला अडवू नका. संगमनेरच्या आमदारासारखे भूकंप झाला, पूर आला तरी हसत रहा.” असा सल्ला कर्डिलेंना देऊन “उमेदवारीसाठी कर्डिले व सत्यजित कदम यांच्यात वाद असेल, तर मी उमेदवारीसाठी तयार आहे.” असे मिश्किलपणे विखेंनी सांगितले.
माजी आमदार कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “राहुरी तालुक्यात लाडकी बहिणी योजनेचे विरोधकांनी भरलेले फॉर्म बाद झाले. त्यांनी राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी चुकीचे फॉर्म भरले. ज्यांनी राहुरी कारखान्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊ दिले नाही. कमानी वरील महाराजांचे नाव छन्नी-हातोडीने तोडले. तेच पुतळा कोसळल्याने उपोषणाचा फार्स करीत आहेत.”
“वांबोरी चारी टप्पा दोनचे काय झाले? मुळा धरणावरील वावरथ-जांभळीच्या पुलाचे काय झाले? निवडणुकीत भावनिक होतील. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. भाजप ज्यांना उमेदवारी देईल. त्यांना विजयी करा.” असेही कर्डिले यांनी सांगितले. शेवटी धीरज पानसंबळ यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.