सोनई : येथील पोलिस ठाण्यातून राहुरीला नुकतेच बदलून गेलेले सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी यांना पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार सेवेतून निलंबित करण्यात येऊन खात्यातर्फे चौकशी करण्यात येणार आहे.
मागील सहा महिन्यांत सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्पष्ट सूचना देऊनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मारामाऱ्या, दादागिरी, गावठी पिस्तुलातून गोळीबार, खून व अवैध धंद्यावर नियंत्रण आणू शकले नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
माळी यांच्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याने चौकशीत अडचण येऊ नये याकरिता निलंबित केल्याचे पोलिस अधीक्षक घार्गे यांनी आदेशात नमूद केले आहे. त्यांनी सोनईचा पदभार घेतल्यानंतर मागील वर्षी पाच खून झाले, तर यावर्षी अवघ्या चाळीस दिवसांत दोन खून व गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. टोळीयुध्द, अवैध धंदे, वाळूचोरी, रस्तालूट, गावठी पिस्तुलाचा धाक वाढला होता.












