सोनई : मानसिक धैर्य खचलेल्या आणि स्वतःचे
मन, घर हरवून बसलेल्या महिलासुध्दा कुणाची तरी बहीण, आई, मुलगी किंवा पत्नी असते. मात्र, त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेणे देशाच्या संस्कार व संस्कृतीला अशोभनीय आहे. जगण्यावरील अन् माणसांवरील विश्वास उडालेल्या महिलांना सुस्थितीत आणण्याच्या कामात आम्ही धन्यता मानत असलो, तरी हे काम करण्याचे भाग्य थांबेल तेव्हाच खरा आनंद होईल, असे प्रतिपादन मनगाव माउली सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. राजेंद्र धामणे यांनी व्यक्त केले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान आयोजित कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमात डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे, साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे, पत्रकार राजीव खांडेकर यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पुरस्कारासाठी निवड झालेले डॉ. संदीप वासलेकर जागतिक परिषदेमुळे उपस्थित राहू शकले नाही.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रास्ताविक भाषणात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी केलेल्या नेत्रदान, गाव तेथे मोफत वाचनालय व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वृक्षारोपण चळवळीची माहिती दिली.
कार्यक्रमास तेलंगणा राज्यातील पूर्व हैदराबादचे पोलिस आयुक्त महेश भागवत, कल्याण तावरे उपस्थित होते. माजी मंत्री शंकरराव गडाख व मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे, डॉ. रंगनाथ पठारे व राजीव खांडेकर यांना यशवंत कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
बंदुकीचा धाक थांबून नक्षलवाद्यांमध्ये परिवर्तन घडविण्यास सुरुवात केली. अवघड वाटणारे काम मनापासून व आत्मियतेने केले तर अवघड काहीच नाही. गडाखांची साहित्य संपदा पाहून खूप प्रेरणा मिळाली.असे प्रतिपादन महेश भागवत, पोलिस आयुक्त, हैदराबाद तेलंगणा यांनी केले.
बहुतेक व्यक्ती समाजाचे दुःख विसरत चालले आहेत. आदर्शत्वाच्या बहुतेक संकल्पना इतिहासजमा होणे देशासाठी घातक आहे. राजकीय निवडणुकीतील स्थिती पाहता मतदान हे कर्तव्य आहे याचा विसर पडत आहे.
असे मत ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. दरम्यान सोनई परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिक लांडे, ऋषिकेश तळेकर, शिवम लोहकरे, अमोल दत्तात्रेय भुसाळ,निकिता दराडे-दहिफळे विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. सुभाष देवढे यांनी सूत्रसंचालन केले.












