गणराज्य न्यूज देवळाली प्रवरा : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्याचे देवळाली प्रवरा शहरात आगमन होताच भक्तिमय वातावरणात राहुरी व देवळाली प्रवरा प्रशासनाच्या वतीने वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रारंभी राहुरी तालुक्यात आगमन होताच हद्दीच्या ठिकाणी तहसीलदार डॉ.अमित पवार, पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी स्वागत केले. त्यानंतर आंबी फाटा येथे चव्हाण कुटूंबियांनी स्वागत केले.
देवळाली प्रवरा शहरात भक्तीमय वातावरणात पालखीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी गटनेते तथा नगरसेवक प्रकाश संसारे, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, नगरसेवक अमोल कदम, डॉ.प्रवीण कोठुळे मुख्याधिकारी ऋषीकेश पाटील, मंगेश ढुस, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत.
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवळाली प्रवरा हनुमान मंदिरात पालखीने विसावा घेतला असता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील डॉक्टरांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून पालखी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.












