राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देव यात्रा उत्सवास बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.
यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. वेदमंत्रांच्या घोषात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह हा सोहळा पार पडला. अभिषेकानंतर कावडधारी भाविकांनी ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या निनादात आणि जयघोष करत भव्य कावड मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिरसात रंगलेले भाविक यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळी पारंपरिक झेंडा मिरवणूक मोठ्या भक्तिभावाने काढण्यात आली. मिरवणुकीनंतर बुवासिद्ध देवांची महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. रात्री राहिंज बंधू प्रस्तुत जागरण-गोंधळाचा कार्यक्रम रंगला. देवी-देवतांच्या पारंपरिक गीतांनी आणि धार्मिक सादरीकरणांनी भाविक मंत्रमुग्ध झाले.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळी महाआरती, महाप्रसाद वाटप तसेच आकर्षक शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवारी यात्रा उत्सवाची कुस्ती स्पर्धेने सांगता होणार आहे.100 रुपयांपासून 51 हजार रुपयांपर्यंत कुस्तीसाठी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रसिद्ध निवेदक गणेश हापसे कुस्ती समालोचन करणार आहेत. कुस्ती मैदान संपल्यानंतर महाआरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहे. कुस्ती स्पर्धेसाठी परिसरातील नामांकित मल्ल यांची नावनोंदणी झाली आहे. नामांकित मल्लांचे डाव प्रतिडाव पहायला मिळणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
लहान मुलांसाठी रहाटपाळणे, विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात आल्याने यात्रेत कुटुंबांसह येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
यात्रा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा. यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
See also: Breaking News










