सोनई : सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे व उद्योजक अनिल शेटे बंधूंनी वडील पोपटराव शेटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त सामाजिक बांधिलकी जपत वारकरी संप्रदायाचा सन्मान म्हणून शिक्षण संस्था,भजनी मंडळ, अनाथालय व सामाजिक संस्थेला चार लाख रुपये किंमतीचे साहित्य व देणगी स्वरुपात मदतीचा हातभार लावला आहे.
सद्गुरु आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे सुश्राव्य किर्तन झाल्यानंतर सोनई पंचक्रोशीतील वीस संस्था, भजनी मंडळ, बाल संगोपन केंद्र, वसतीगृह व २७ किर्तनकार महाराजांना वारकरी संप्रदायाचे कार्य उज्ज्वल होण्यासाठी मृदंग, हार्मोनियम, टाळ व रोख देणगी देण्यात आली.
कार्यक्रमात प्रकाश शेटे यांनी विधायक उपक्रमाची माहिती दिली. संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त विश्वासराव गडाख यांनी संतपूजन केले.विजय महाराज खेडकर, महंत सुनिलगिरी महाराज, पंढरीनाथ महाराज तांदळे,आमदार विठ्ठलराव लंघे, किशोर महाराज गडाख, माऊली महाराज मोरे,कृष्णाई गुरुकुलच्या तेजस्विनी महाराज नवले, साध्वी तुलसीदेवी, रामेश्वर महाराज राऊत, उषादिदी, शेतकरी संघटनेचे अॅड अजित काळे, विविध संस्थेचे पदाधिकारी, राजकीय मान्यवर व सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच तीसहून अधिक संत,महंत व किर्तनकार महाराज उपस्थित होते. कार्तिक शेटे व शंतनु शेटे यांनी मान्यवरांचा सत्कार केला.सुखदेव शेटे यांनी सुत्रसंचालन केले.
किर्तनात उध्दव महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा करण्यात आलेला सन्मान सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा दाखला दिला. जीवनात जन्माप्रमाणे मृत्युचाही सोहळा कसा केला जातो याचा आदर्शपाठ शेटे परिवाराकडून करण्यात आल्याचे सांगून महाराष्ट्रात प्रथमच पुण्यस्मरण कार्यक्रमात लग्न सोहळ्यात घेण्यासाठी भांडे मांडतात त्याप्रमाणे घेण्यासाठी नव्हे तर समाजहित करीता देण्यासाठी येथे मृदंग, हार्मोनियम व भजनाचे साहित्य एका रॅकमध्ये लावल्याचे प्रथमच पाहण्यास मिळाले असे सांगून कार्याचा गौरव केला.
————————————











