Home महाराष्ट्र अबब.. 2 कर्मचाऱ्यांच्या खाती 1 कोटी

अबब.. 2 कर्मचाऱ्यांच्या खाती 1 कोटी

50
0

गणराज्य न्यूज अहिल्यानगर – बहुचर्चित शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या बनावट ॲप प्रकरणाच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तब्बल एक कोटी रूपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. ही रक्कम अधिकृत परवानगी असलेल्या आणि बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या ॲप्सच्या माध्यमातून प्राप्त झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या रकमेचा पुढील प्रवास नेमका कुठे झाला, कोणकोणाच्या खात्यात गेली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुधवारी (३० जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कबाडी उपस्थित होते.

ॲप घोटाळ्यात दर्शन, अभिषेक व इतर सेवांसाठी भाविकांकडून ५०० ते ५ हजार रूपयांपर्यंत रकमा आकारण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रक्कम तुलनेने लहान असल्याने कोणीही थेट फिर्याद दिली नव्हती, मात्र हजारो भाविकांकडून अशा प्रकारे रक्कम घेतली गेल्याने एकूण घोटाळ्याची रक्कम प्रचंड मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होत तपास सुरू केला.

देवस्थानकडून फक्त तीन ॲपलाअधिकृत परवानगी देण्यात आली होती. परंतु तपासात चार अनधिकृत ॲप कार्यरत असल्याचे समोर आले असून, आणखी ॲप कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अप देशभरातील अन्य देवस्थानांनाही लिंक केले गेले असल्याची माहितीही उघड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here