राहुरी : शहरातील नगर–मनमाड महामार्गालगत संत गाडगेबाबा आश्रम शाळेसमोरील संत गाडगेबाबा व्यापारी संकुलातील स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
घटनास्थळी आढळलेल्या प्राथमिक पुराव्यांवरून चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरात गॅस कटरचे अवशेष सापडल्याने या शक्यतेला बळ मिळाले आहे.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. सहाय्यक फौजदार आर आर बी कर यांच्या नेतृत्वाखाली ‘राणी’ या श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला; मात्र एटीएमसमोरच माग थांबल्याने चोरटे वाहनातून आले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
३५ लाख रुपये भरल्याची चर्चा
स्थानिकांमध्ये एक दिवसापूर्वीच एटीएममध्ये सुमारे ३५ लाख रुपये भरल्याची चर्चा होती. त्यामुळे चोरीची रक्कम मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देखरेख करणारी कंपनी नाशिकवरून अद्याप न आल्याने उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील गजबजलेल्या भागातच एटीएम फोडण्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे लवकरच आरोपींचा माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.














