राहूरी
वांबोरी चारी धामोरी परिसरात नादुरुस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चारीच्या दुरावस्थेमुळे पाणी वाया जात असून शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या.
पाहणी दरम्यान चारीची दयनीय अवस्था पाहून प्राजक्त तनपुरे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संबंधित अभियंता सायली पाटील यांच्याशी संपर्क साधला. शेतकऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच नादुरुस्त चारीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि ज्या शेतकऱ्यांच्या पाणी शेतात शिरल्याने नुकसान झाले आहे.
त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गेल्या काही दिवसांपासून चारीला भगदाड पडल्याने किंवा पाणी गळती होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याने तनपुरे यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी बाबासाहेब सोनवणे,अभय सोनवणे, भाऊसाहेब जाधव, जयराम खेडेकर, उत्तम उगले,नानासाहेब सोनवणे, दीपक उगले, जगन्नाथ उगले, लहाणु उगले व इतर ग्रामस्थांचा समावेश होता. चारीच्या कामाला लवकरच सुरुवात न झाल्यास पुढील आंदोलनात्मक पावले उचलली जातील, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला.











