सोनई | गणराज्य न्यूज वेब टीम
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ सोनई शहर व परिसरातील समस्त ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, व्यापारी असोसिएशन, तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विविध संघटनांनी गुरुवार (दि. २३ जुलै) रोजी भव्य, शांततामय व संविधानिक निषेध मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
सोनई सहकारी सोसायटीच्या प्रांगणातून सुरू झालेला हा मोर्चा सोनई शहरातील प्रमुख मार्गांवरून सोनई पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, युवक, महिला आणि नागरिक सहभागी होत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला.
मोर्चात जिल्हा परिषद अहिल्यानगरचे पशुसंवर्धन व अर्थ-बांधकाम समितीचे सभापती सुनील गडाख पाटील सहभागी झाले. मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मा. पोलीस अधीक्षक, मा. जिल्हाधिकारी, विभागीय पोलीस अधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाकडे तातडीने पाठविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना सुनील गडाख म्हणाले की, देशभरातील विद्यार्थी NEET, JEE, TET, UPSC, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे मेहनत घेतात आणि पालक लाखो रुपये खर्च करतात. अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता किंवा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे खेळ होत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडल्याचा आरोप असलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. तसेच त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.अशी भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय म्हणून न पाहता त्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर विषय म्हणून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्यायाची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमार, मारहाण व गैरवर्तनाच्या घटनांची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी वक्त्यांनी सांगितले की, देशातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च, मानसिक ताण आणि अनेक वर्षांचे परिश्रम घेत असतात. अशा परिस्थितीत पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
मोर्चादरम्यान जंतर-मंतर परिसरात आंदोलनावेळी दगडांनी भरलेला ट्रक आणल्याच्या चर्चेचाही उल्लेख करण्यात आला. या संदर्भातील वस्तुस्थिती निष्पक्ष चौकशीतून समोर आणून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
निवेदनात जखमी विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचार, अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्यात आलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई, करण्यात यावी आंदोलनाशी संबंधित निरपराध विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भविष्यासंदर्भातील प्रश्नांवर केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेणे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मानवी हक्कांचा सन्मान करणारी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
या शिवाय NEET व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी, पेपरफुटी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
मोर्चात समस्त सोनई ग्रामस्थ, सोनई व्यापारी असोसिएशन, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण मोर्चा शांततामय, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने पार पडला.
शेवटी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हे देशाच्या भविष्याशी निगडित असल्याचे सांगत, संबंधित सर्व घटनांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास दृढ करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या दरम्यान सोनई पोलिसांन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.








