Home महाराष्ट्र १४ शिक्षक व २ केंद्रप्रमुखांचा गौरव

१४ शिक्षक व २ केंद्रप्रमुखांचा गौरव

46
0

 

लोणी प्रवरानगर : प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा पाया असून हा पाया भक्कम झाला तर देशासाठी आदर्श नागरिक घडविणे शक्य होईल. शिक्षकांनी बदलत्या काळाचे वास्तव लक्षात घेऊन तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासह शिक्षण देण्याचे सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा प्रवरानगर येथील डॉ धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता.जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी योजना बाळासाहेब बुगे, गट विकास अधिकारी विवेक गुंड यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता वास्तवाचा आधार घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे आवश्यक आहे. विशेषतः ग्रामीण व तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.खासगी शाळांमधील विद्यार्थी सरकारी शाळांकडे वळू लागले आहेत. ही बाब सरकारी शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर असलेला विश्वास अधोरेखित करणारी आहे.

बदलत्या काळानुसार ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, त्याचे काही दुष्परिणामही आता दिसून येत आहेत. अनेक विद्यार्थी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. विद्यार्थ्यांचा सोशल मीडिया व मोबाईलचा वापर मर्यादित करण्यासाठी पालक, शिक्षक आणि शालेय प्रशासनाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षकांनीही शालेय वेळेत मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा. शिक्षकांचे आचरण विद्यार्थी अनुकरण करीत असल्याने शिक्षकांनी स्वतः मोबाईलचा वापर कमी केल्यास विद्यार्थ्यांमध्येही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे त्यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रभावीपणे काम करावे. प्राथमिक स्तरावरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा, कौशल्यांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्यास भविष्यात सक्षम व आदर्श नागरिक घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शाळांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या गणित व विज्ञान प्रदर्शनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होते. अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी होऊन पुढील संशोधनासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य व प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असेही पालकमंत्री म्हणाले.
शाळांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य देणे आवश्यक असून प्रत्येक शाळेत १०० टक्के स्वच्छतागृह सुविधा, डिजिटल बोर्ड, सुसज्ज वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयात निवड झालेले ५२ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील आहेत, हे अभिमानास्पद आहे. यावरून प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित होत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

याप्रसंगी भारत सरकार वीरगाथा पुरस्कार मिळालेली विद्यार्थिनी मंजुश्री सुधीर घोरपडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माथणी तालुका अहिल्यानगर हिचा सन्मान करण्यात आला तसेच मिशन आरंभ उपक्रमांतर्गत राहाता तालुक्याने विद्यार्थ्यांच्या सरावासाठी तयार केलेल्या प्रश्नपेढीचे अनावरण करण्यात आले.

जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळ्याचे प्रास्ताविकात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी शिक्षण विभागाअंतर्गत राबवित असलेल्या जिल्ह्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली.

पुरस्कारप्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख
जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये सुमन खतोडे, उपाध्यापिका, जि. प. नवलेवाडी, अकोले, दिपाली रेपाळ, उपाध्यापिका, जि. प. जाखुरी, संगमनेर, सुनील पोरे, उपाध्यापक, जि. प. घोयेगाव, कोपरगाव, संदीप कोरडे, उपाध्यापक, जि. प. गोरडेवस्ती, राहाता.स्वाती पटारे, उपाध्यापिका, जि. प. अशोकनगर, श्रीरामपूर. सुवर्णा कचरे, उपाध्यापिका, जि. प. कुक्कडवेढे, राहुरी. राहुल आठरे, पदवीधर, जि. प. भालगाव, नेवासा.सुरेखा खाडे, उपाध्यापक, जि. प. रांजनी, पाथर्डी.अमोल पवार, उपाध्यापक पदवीधर, जि. प. बावी, जामखेड. अमोल हुमे, उपाध्यापक, जि. प. अंबिकानगर, कर्जत.शहाजी खराडे, उपाध्यापक, जि. प. भानगाव, श्रीगोंदा.प्रवीणकुमार झावरे, उपाध्यापक, जि. प. टाकळी ढोकेश्वर, पारनेर; मनोज काशीद, उपाध्यापक, जि. प. खोसपुरी, अहिल्यानगर. किशोर मिसाळ, उपाध्यापक, जि. प. झिरपेवस्ती, शेवगाव तसेच केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव, धांदरफळ, संगमनेर आणि केंद्रप्रमुख रामराव निकम, पाटोदा, जामखेड यांचा समावेश आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यातून इतर शिक्षकांनी प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगदान द्यावे. शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक बदलांसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शिक्षकांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

याप्रसंगी माझी आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर तालुका कोपरगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा तालुका नेवासा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसखेडे तालुका संगमनेर त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील प्रथम क्रमांकाच्या शाळांना सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here