गणराज्य न्यूज राहुरी फॅक्टरी
“जिथे महिलांची संख्या चांगली असते, त्या मंडळाचे काम अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि प्रभावी असते. धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांतही राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे कार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणपती बाप्पाची अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापणा करण्यात आली.प्रसंगी श्री.वाघचौरे बोलत होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते ताहाराबाद चौक अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सचिन काळे गुरू यांच्या वेदमंत्र गजरात गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अशोक शिंदे, बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, गोविंद राऊत, नितीन भालेराव आदिंसह परिसरातील नागरिक व माता भगिनी व राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे म्हणाले की, गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. रात्री १० वाजेनंतर ध्वनीवर्धकांचा वापर टाळावा, विसर्जन मिरवणुका निर्धारित मार्गांवरच काढाव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा अनुचित प्रकार टाळावा. “सामाजिक माध्यमांवर कोणतीही अफवा पसरवू नका, अशा गोष्टी दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा. पोलिस प्रशासन आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, नागरिकांनी सहकार्य केल्यास हा उत्सव अधिक सुंदरपणे पार पडेल,” असा विश्वास व्यक्त केला.













