गणराज्य न्यूज राहुरी
शेतकर्यांना भाकड जनावरे तसेच गायीच्या लहान वासरांचा सांभाळ होत नसल्याने त्यांना बेवारस सोडून दिले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. राहुरी येथील ताहाराबाद परिसरात बेवारस सोडून दिलेला वासरू काटवनात अडकल्याचे पाहून एका युवतीने तिला जीवदान दिले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्या वासराची जबाबदारी स्विकारली. जनावरांना धोकादायक परिस्थितीत न सोडता गोशाळेत पाठवा असे आवाहन पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी केले आहे.
रविवारी (२० जुलै) रोजी तरुणी ऋतुजा कैलास कांबळे (२५) रा. निर्मळ पिंप्री ता. राहाता ही पुणे येथून राहुरीकडे येत होती. ताहाराबाद मार्गे हद्दीतून कानडगाव येथे जाणार्या त्या युवतीला घाटामध्ये असलेल्या काटेरी झुडुपामध्ये दोन ते तीन दिवस वय असलेले गायीचे वासरू (गिर गायीचा गोर्हा) मरणासन्न अवस्थेत टाकून दिल्याचे निदर्शनास आले. त्या युवतीने लगतच्या दिशेने येणार्या जाणार्यांना थांबवत मदत मागितली. काटेरी झुडुपामध्ये अडकलेल्या त्या गायीच्या वासरूला बाहेर काढत त्या युवतीने पाणी पाजले. तेथे जमा झालेल्या शेतकर्यांना विनवणी करून त्या वासरुचा सांभाळ करावा अशी विनवणी केली. परंतू कोणीही त्या वासरूचा सांभाळ करण्यास तयार होत नसल्याने हताश अवस्थेत ती तरुणी उभी होती. दुचाकीवर असलेल्या त्या वासरूला पाहून तेथून जात असलेले राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व त्यांच्या पत्नी जया ठेंगे यांनी थांबा घेतला. दुचाकीवर त्या वासराला का ठेवले? अशी विचारणा केल्यानंतर पोलिस निरीक्षक ठेंगे यांना तरुणी ऋतुजा कांबळे हिने सविस्तर प्रकार सांगितला. बेवारस सापडलेल्या त्या निरागस वासराचा कोणीच सांभाळ करण्यास तयार नसल्याने तुम्ही त्याला गोशाळेत पाठवा अशी विनवणी तरुणीने पोलिस निरीक्षक ठेंगे यांना केली.
उपस्थित सर्व शेतकर्यांनी त्या वासराचा सांभाळ करण्यास नकार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक ठेंगे यांनी वासराची जबाबदारी घेतली. गिर गायीचा तो वासरू लहान असल्याने चारा खात नसल्याने गो शाळेमध्ये घेण्यास नकार मिळाला. पोलिस ठाण्यामध्ये वासराला आणल्यानंतर पोलिस ठाणे अंमलदार बबन राठोड यांच्याकडे सोपवत ज्यांचे वासरू असेल त्याने ते वासरू घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. परंतू बेवारस वासरूला स्विकारण्यास कोणीही पुढे न आल्याने जो पर्यंत चारा खात नाही तो पर्यंत त्या वासराचा सांभाळ करण्याची जबाबदारी पोलिस ठाणे अंमलदार राठोड यांनी घेतली.
———
जनावरांना धोकादायक अवस्थेत सोडू नका- पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे आवाहन
भाकड जनावरे तसेच लहानग्या वासरुंना धोकादायक अवस्थेत बेवारस सोडण्याचे प्रकार वाढले आहे. कृपया कोणीही भाकड जनावरे तसेच लहानग्या वासरुंना बेवारस सोडू नये. जनावरांचा सांभाळ होत नसल्यास त्यांना गोशाळेत पाठवा असे आवाह पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.













