Home राहुरी राहुरीत आज लोकशाहीचा उत्सव

राहुरीत आज लोकशाहीचा उत्सव

11
0

गणराज्य न्यूज राहुरी : राहुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.तर लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारराजा तयारीत आहे.

एकूण १२ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन प्रमाणे २४ सदस्य आणि नगराध्यक्षपद अशा एकूण २५ जागांसाठी निवडणूक होत आहे. बारा प्रभागांमध्ये ३८ मतदान केंद्र असून मतदान प्रक्रियेसाठी २३५ कर्मचारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर तसेच शहरांमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैण्यात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यादव म्हणाले की, राहुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण ३३,२७० मतदार मतदानास पात्र आहेत. बारा प्रभागांमध्ये एकूण ३८ मतदान केंद्र तयार केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक हजारांच्या आंत मतदार संख्या ठेवली आहे. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे शुद्ध पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना बैठक व्यवस्था व मतदान केंद्रात जाण्यासाठी चाकाची खुर्ची, प्रथमोपचार व्यवस्था अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

निवडणूक प्रक्रियेत २३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान वेळेनंतर उशिरापर्यंत मतदारांची रांग लागलेली असते. असे ८ मतदान केंद्र निवडले आहेत. विहित वेळेपूर्वी रांगेत उभे असलेल्या मतदारांना नंबर क्रमांक देऊन मतदान घडवून आणले जाईल. विहित वेळेनंतर आलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही.

प्रभाग २ (अ) मध्ये एका सदस्य पदाची निवडणूक पुढे ढकल्याने या प्रभागातील मतदान यंत्रावर प्रभाग २ (ब) मधील एका सदस्य पदासाठी व नगराध्यक्षपदासाठी असे दोन मतदान घेतले जाईल. इतर सर्व प्रभागांमध्ये सदस्य पदासाठी दोन व नगराध्यक्षपदासाठी एक असे तीन जागांसाठी मतदान यंत्रावर मतदान घेतले जाईल. दोन जणांचे पोस्टल मतदानासाठी अर्ज आले आहेत.
दिव्यांग व वृद्ध मतदारांना घरी मतपत्रिका पाठवून मतदानाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मतदान केंद्रापर्यंत येऊ शकत नाही, अशा दिव्यांग व वृद्ध मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी स्ट्रेचरसह रुग्णवाहिका पाठविण्याची व्यवस्था केली जाईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here