गणराज्य न्यूज ब्राम्हणी : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखेत 33 वर्ष प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणारे स्व.सिताराम रामभाऊ तेलोरे (साहेब) यांचे रविवार दि.९ नोव्हेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित भावपूर्ण श्रद्धांजली! प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आदर्श विद्यालयाच्या मैदानावर सकाळी 10 वाजता हभप लक्ष्मण महाराज शास्त्री यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे.
साहेबांच्या जीवनकार्याचा थोडक्या शब्दांत प्रवासवर्णन…
आई सीताबाई व वडील रामभाऊ यांच्या पोटी जन्म..साहेबांना एक बहिण
सर्वसामान्य तेलोरे कुटूंब : आई वडिलांनी काबाड कष्ट करून लेकरांना शिकविण्याचा प्रयत्न केला.ब्राम्हणी गावची जुनी पेठ वेशीपासून खालीच होती.तिथेच साहेबांचे वडील रामभाऊ यांनी घरासमोरच चप्पल दुकान सुरू केले. त्याकाळी धान्य घेवून (वस्तुरुपात) वस्तूची विक्री होत.दरम्यान आई वडिलांनी मुळा उजवा कॅनॉलचे काम करून प्रपंच उभा केला..साहेबांनी शाळा करून भाजीपाला विक्रीच काम केले.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ब्राम्हणी गावात पूर्ण केले.उच्च शिक्षण एम कॉम नगरला पूर्ण केले.सुरुवातीला पाच महिने ब्राम्हणी सहकारी सोसायटीत क्लार्क म्हणून काम केले.
अवघ्या काही महिन्यात त्यांना जिल्हा सहकारी बँकेत नोकरीचा कॉल आला.जामखेडमध्ये जिल्हा बँकेच्या शाखेत पाचशे रुपये पगारावर रुजू झाले.जामखेड नंतर 3 वर्षात राहुरी येथे बदली झाली.क्लार्क पदानंतर उंबरे ते बदलीने कॅशियर म्हणून नियुक्ती झाली. मानोरी शाखेत अनेक दिवस काम केले. आरडगाव व महाडूक सेंटर शाखेत मॅनेजर पदावर काम करण्याची संधी मिळाली.
साहेब मार्च 2027 मध्ये सेवानिवृत्त होणार होते.त्यापूर्वीच गतवर्षी त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.जिल्हा बँकेच्या विविध शाखेत नोकरी करताना त्यांनी कुटुंबापेक्षा सेवेच्या ठिकाणी अधिक वेळ दिला. प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पडले. बँक खातेदारांची सेवा यालाच त्यांनी कायम प्राधान्य दिले. सर्वसामान्य बँक खातेदारांची अडवणूक होवू नये हाच त्यांचा प्रामाणिक उद्देश होता.जेथे जेथे साहेबांनी नोकरी केली त्या परिसरातील सर्वसामान्य शेतकरी बँक खातेदार आजही त्यांच्या आठवणींना उजाळा देतात.
आपल्याप्रमाणे आपला परिवार उच्च शिक्षित असावा.यासाठी दोन्ही मुले व मुलीला त्यांनी शिकविले. त्यांचे लग्न करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.आज त्यांच्या पश्चात आई सीताबाई व पत्नी अंजलीताई कुटुंबाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. बहिण लिलाबाई सिताराम साळवे सोनई गावात आहे. एक मुलगा व्यवसाय तर, दुसरा मुलगा ललित शिक्षक आहे.गौरव आजोबा स्व.रामभाऊ तेलोरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपला पारंपरिक व्यवसाय वेदांत शू पॅलेसच्या माध्यमातून चालवित आहेत.तर,ललित हे नामांकित शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहेत.एक सुन गृहिणी तर दुसरी अहिल्यानगर महानगरपालिकेत सेवेत आहेत. मुलगी योगिता बाचकर गृहिणी तर जावई बाबासाहेब बाचकर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.














