गणराज्य न्यूज सोनई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुळा एज्युकेशन संस्थेच्या कृषि महाविद्यालयात आदर्श पत्रकार पुरस्कार आणि मतदार जनजागृती अभियान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य डॉ.हरी मोरे यांच्या हस्ते आदर्श पत्रकार म्हणून विनायक दरंदले व सुनिल दरंदले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या सभागृहात वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.संदिप तांबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पत्रकारीतेच्या माध्यमातून आपल्या लेखणीद्वारे सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,राजकीय तसेच दररोजच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम सोनईचे पत्रकार विनायक दरंदले व सुनिल सोपानराव दरंदले करत आहेत.या त्यांच्या कार्याची दखल म्हणून मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात
यावर्षीचा “आदर्श पत्रकार पुरस्कार २०२४” देवून गौरविण्यात आले.शाल, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र व वृक्ष रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुरस्काराला उत्तर देतांना विनायक दरंदले म्हणाले, कृषि महाविद्यालयाचे काम इतर महाविद्यालयाच्या तुलनेने खूप नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे सांगून कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेशी जोडलेली नाळ संपुर्ण महाराष्ट्र राज्यासाठी भुषणावह असल्याचे सांगितले.
उपप्राचार्य प्रा.सुनिल बोरूडे यांनी मतदार जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.अशोक शिरसाठ व प्राध्यापक उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ.हरी मोरे यांनी मराठी भाषेचा नेहमी अभिमान ठेऊन कुठल्याही भाषेचा अभ्यास करा मात्र बोली भाषेचा विसर पडून देवू नका असे आवाहन केले. विद्यार्थी जीवन जाधव याने सूत्रसंचालन केले तर सिद्धी नन्नवरे हिने आभार मानले.