राहुरी – राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी सत्तेत सहभाग होण्याचा निर्णय घेतला. परिणामी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींवरच नव्हे तर लाडक्या भावांनाही शासनाचे प्रेम मिळणार आहे. राहुरीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या पुढाकाराने संपन्न होत असलेला भव्य रोजगार मेळावा राज्यात आदर्शवत ठरणारा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील टाकळीमिया रस्ता परिसरातील रघुनंदन लॉन्स येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवकचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रोजगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा हे होते. याप्रसंगी चव्हाण म्हणाले की, राज्यामध्ये सर्वच पक्षांनी आपली भूमिका बदलली. भाजप, सेना, राष्ट्रवादीसह काँगे्रस पक्ष एकमेकांविरोधात लढले असतानाही एकमेकांच्या गळ्यात गळे घालत सत्ता उपभोगली. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपल्या भूमिकेत बदल न करता केवळ सत्तेच्या माध्यमातून विकास कामांना बळ मिळावे म्हणून सत्तेत सहभाग घेतला. परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतूनच राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंमलात येत आहे. विरोधकांनी त्यास मोठा विरोध करीत राज्य शासन केवळ बहिणींचाच विचार करत आहे. भावांचा विचार करणार का? असा प्रश्न उपस्थित करीत असतानाच शासनाने लाडका भाऊ योजना आणली. बहिणीसह भावालाही शासनाकडून निधी दिला जाणार आहे. प्रत्येक महिन्याला तो निधी बहिण व भावाच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे विरोधकांची वायफळ टिकेकडे दुर्लक्ष करा. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांची साथ गरजेची आहे. राहुरीत आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासाठी हजारो युवक-युवतींचा सहभाग पाहता पदाधिकार्यांची मेहनत यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. राहुरीचा भव्य रोजगार मेळावा राज्यामध्ये आदर्शवत ठरणारा असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
रोजगार मेळाव्यात सुमारे २ हजार पदे भरण्यात आली. ५७ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर हजारो युवक युवतींना नियुक्ती पत्र दिल्यानंतर उपस्थित तरुण-तरुणींसह पालकांचे डोळे पानावले होते. रोजगार प्राप्त करणार्यांनी आयोजक युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गागरे यांचे आभार मानले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नाहाटा,पक्षाचे प्रांतिक सदस्य अजित कदम, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे, उद्योजक सुनिल गुट्टे, अच्यूत जाधव, शहर अध्यक्ष सुनिल भट्टड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार राहुरी युवक काँगे्रसचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी मानले. याप्रसंगी व्यासपिठावर बारामती इंडस्ट्रीयलचे अध्यक्ष धनंजय जामदार, राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार उंडे, तालुका अध्यक्ष दिलीप जठार, निलेश शिरसाठ, अक्षय गोपाळे, सरपंच अर्जुन म्हसे, भाऊसाहेब ढोकणे आदींसह तरुण-तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले