राहुरी : तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळ मृदंगाच्या गजरात व जयहरी चा जयघोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस लाईन गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक काल सायंकाळी काढण्यात येऊन मुर्ती विसर्जन करण्यात आले.
गणपती विसर्जन मिरवणूक म्हटले कि, गणपती बाप्पा समोर डिजेच्या तालावर कर्ण कर्कश आवाजात अश्लील गाणे लाऊन धिंगाणा घालणारे तरुण आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतू राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळ मृदंगाच्या गजरात व जयहरी चा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अनेक दिवसांपासून राहुरी येथे डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना अपयश आले मात्र काल दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस लाईन गणेश मंडळात सत्यनारायण पुजा करुन अन्नदान करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी चार वाजता गणेश मुर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये ढोल ताशा सारखे पारंपरिक वाद्य वाजविण्यात आले. तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकी दरम्यान बाल गोपालांनी साजर केलेला रिंगण सोहळा नेत्रदीपक ठरला. यावेळी जयहरीच्या जयघोष व टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. शहरातील नेते व व्यापाऱ्यांनी मिरवणूकीचे स्वागत करून पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच महिला व व्यापाऱ्यांनी टाळ व मृदुंगाच्या तालावर ठेका धरला. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी गुलाची उधळण करत फुगडी खेळून मिरवणूकीत सहभाग नोंदवीला.
राहुरी शहरात प्रथमच टाळ मृदंगाच्या गजरात व जयहरी चा जयघोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आल्याचे पाहून शहरातील नागरिक भारावून गेले होते. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक नवा इतिहास रचला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व राहुरी पोलिस ठाण्याचा आदर्श घेऊन तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. असे मत यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, माजी उप नगराध्यक्ष दादापाटील सोनवणे यांनी व्यक्त केले.