राहुरी : तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेला विविध प्रकारचे आमीष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला. याबाबत श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.न्यायालयात सात तास युक्तिवाद झाल्यानंतर 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
राहुरी तालुक्यातील एक ३५ वर्षीय महिला ही श्रीरामपूर मतदार संघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या घरी शेती काम करत होती. या दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली होती. या दरम्यान भानुदास मुरकुटे यांनी पिडीत महिलेला २०१९ मध्ये गुंगीचे औषध देऊन तीच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर पिडीत महिलेला घर, शेती घेऊन देतो. तसेच मुलाला नोकरी लावून देतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे आमीष दाखवून तीच्यावर अहमदनगर जिल्ह्यात आणि मुंबई, दिल्ली अशा विविध ठिकाणी पिडीत महिलेवर अत्याचार करण्यात आला. अशी माहीती पोलिस सूत्रांकडून मिळाली. या घटने बाबत पिडीत महिलेने काल सायंकाळी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तीच्या फिर्यादीवरून माजी आमदार भानुदास काशिनाथ मुरकूटे याच्यावर गुन्हा रजि. नं. १०७०/२०२४ भादंवि कलम ३७६ (२ एन), ३२८, ५०६, ४१८ प्रमाणे अत्याचाराचा गुन्हा करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, श्रीरामपुर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस उप निरीक्षक समाधान साळुंके, राहुरी व श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यातील तपास पथक व महिला पोलिस कर्चचारी अशा सुमारे २५ ते ३० पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाट्याने आज दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे १.३५ वाजे दरम्यान माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यावेळी भानुदास मुरकुटे यांनी त्यांच्या घराला आतून कडी लावली होती. पोलिस पथकाने मुरकुटे यांच्या घराच्या गॅलरीत चढून आत प्रवेश केला आणि आतून घराची कडी उघडली. त्यानंतर सर्व फौजफाटा आत घुसला आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना ताब्यात घेतले. अशी माहिती मिळाली आहे. आज सकाळी भानुदास मुरकुटे यांचे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात मेडिकल तपासणी करून त्यांना गजाआड केले.
दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने या घटने बाबत जिल्ह्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.













