अहिल्यानगरः हजारो वाहनांचा ताफा सोबत घेऊन आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. बुधवारी दुपारी दोन वाजता ते अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करणार होते. मात्र त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत असल्याने त्यांना जिल्ह्यात येण्यास रात्री उशिर झाला. रात्री साडेआठ वाजता ते शेवगाव शहरात दाखल झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातून १३२ किलो मीटरचा प्रवास करून ते आळेफाटा मार्गे किल्ले शिवनेरीवर मुक्कामी गेले. अहिल्यानगर शहरात येण्यास त्यांना मध्यरात्र उलटून गेली होती.
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील शुक्रवारपासून मुंबई येथील अझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. आंदोलनासाठी ते अंतरावाली सराटी येथून बुधवारी सकाळी निघाले. दुपारी दोन वाजता ते कन्हेटाकळीमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करतील, असा प्रशासनाचा अंदाज होता. त्यादृष्टीने मोठ्या फौजफाट्यासह पोलिस अधिकारी सकाळी आठ वाजल्यापासूनच कन्हेटाकळी येथे दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठकाणी मराठा बांधव उपस्थित होते. जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात येत होते. त्यांच्या ताफ्यात दोनशे वाहनांचा समावेश असून, सुमारे ८०० वाहनांतून मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत.













