अहिल्यानगर : जिल्ह्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने राहाता व पाथर्डी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
राहाता तालुक्यातील सोमनाथ जिजाबापू गाडगे (वय ३६, रा. लोणी खुर्द) आणि पाथर्डी तालुक्यातील शिवाजी रघुनाथ खेडकर (वय ५४, मालेवाडी) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील मापरवाडी भागात राहणारे सोमनाथ गाडगे यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जमिनीत कांदा लागवड केली आहे. सोमवारी काही महिला मजुरांना कांदा काढणीचे काम दिले होते. दिवसभर कांद्याची काढणी केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. महिला मजूर पावसापासून बचावासाठी प्लास्टिक कागदाच्या आश्रयाला असताना त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या सोमनाथ यांच्यावर वीज कोसळली. मोठा आवाज झाला आणि आगीचे लोळ त्यांच्या अंगावर कोसळले.











