राहुरी – तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये दाखल एकूण २९४ प्रकरणांपैकी २३१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. १९ प्रकरण पुर्ततेवर ठेवण्यात आले.तर ४४ प्रकरणे नामंजूर झाली.
यावेळी समितीचे सचिव तथा प्रभारी तहसीलदार मिलिंद कुलथे, योजनेचे नायब तहसिलदार सचिन औटी, नायब तहसिलदार संध्या दळवी, पुनम दंडीले, विस्तार अधिकारी गणेश अनारसे, सदस्य नारायण धनवट, गोरख अडसुरे, अविनाश बाचकर, अजित डावखर, संदीप आढाव, किरण ससाणे, उत्तमराव खुळे, संजय गांधी योजना शाखेचे अव्वल कारकून संजय वाघ, नंदा मकासरे, भारत जरे, आय टी मंगेश साठे आदी उपस्थित होते. यावेळी प्रभारी तहसीलदार पदी मिलिंद कुलथे व मुख्याध्यापक पदी उत्तमराव खुळे सर यांची निवड झाल्याबद्दल समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी सांगितले की, खा.डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विधवा, निराधार, दिव्यांग, वृद्ध यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी समितीचे सर्व सदस्य काम करत आहेत. तालुक्यातील नागरिकांनी आपली कागदपत्रे स्वतः जमा करावीत. समितीच्या नावाखाली कोणी एजंट पैशाची मागणी करत असेल तर तक्रार करावी. लाभार्थ्यांना काही विचारणा अथवा माहिती हवी असेल तर समिती अध्यक्ष किंवा कोणत्याही सदस्याबरोबर संपर्क साधावा असे आवाहन केले.