Home Blog ५३२ लाभार्थ्यांना पत्र

५३२ लाभार्थ्यांना पत्र

61
0

राहुरी : तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून समाधानकारक काम सुरू असून निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम समितीने केले आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे.

राहुरी येथील संत गाडगे महाराज आश्रम शाळा येथे संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरण मंजूर झालेल्या सुमारे ५३२ लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले. प्रसंगी समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ, भाजप तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, माजी सभापती भीमराज हारदे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, मा.संचालक संचालक रवींद्र म्हसे, ब्राह्मणीच्या सरपंच सौ. सुवर्णा बानकर, अनिल आढाव, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, बापूसाहेब वाघ, सदस्य सर्जेराव घाडगे, नारायण धनवट, संदीप आढाव, दिपक वाबळे, अजित डावखर, प्रभाकर हरिश्चंद्र, गणेश खैरे, बबन कोळसे, अशोक घाडगे, बाबासाहेब शिंदे,अरुण बानकर, सचिन मेहत्रे, विलास मुसमुडे, अरूण साळवे, उमेश शेळके आदी उपस्थित होते.

यावेळी कर्डिले यांनी सांगितले की, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राहुरी तालुक्यातील अनेक विकास कामे सुरू झाली. त्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेची समिती स्थापन करण्यात आली. या समितीने जिल्ह्यात नंबर एकचे काम करून ५३२ प्रकरणे मंजूर केली असून आज अखेर १६२४ प्रकरणे मंजूर केली आहे. हा मोठा उच्चांक आहे. राहुरी तालुक्यात केवळ ६ बैठकीत वर्षात सर्वाधिक प्रकरणे या समितीच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत. त्यामुळे या समितीचे काम खरोखर कौतुकास्पद असुन निराधार आणि अपंग यांना आधार मिळण्याचे काम याव्दारे झाले असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसापासून ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नासंदर्भात आरोप- प्रत्यारोप होत आहे. त्यामुळे कर्डिले यांनी आ. प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख टाळत थेट हल्लाबोल केला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या जागेसंदर्भात काही न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात सर्व शासकीय इमारती एकाच ठिकाणी व्हाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालय देखील मंजूर केले होते. मात्र दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांना विरोध करण्याचे काम फक्त हे करत आहेत. शहरासाठी पिण्याचे पाण्याची योजना देखील आम्ही मंजूर केली मात्र त्याचे देखील श्रेय घेण्याचा यांनीच प्रयत्न केला. भाजप सरकारने केलेल्या कामांचे प्रसिद्धी माध्यमातून आपणच ते काम केल्याचा कांगावा देखील हे करत आहेत. राहुरी शहरातील बाजारपेठ बंद पाडण्याचे खरे काम यांनीच केले आहे. डॉ.तनपुरे कारखाना बंद पाडून बाजारपेठ उध्वस्त केली आणि आता बाजारपेठा उध्वस्त होऊ नये म्हणून निवेदन दिले जाते मात्र त्याचा आणि रुग्णालयाचा कुठलाही संबंध नाही म्हणून राहुरी शहरातील नागरिक आता तहसीलदारांना निवेदन देऊन रुग्णालयाचे काम सुरू व्हावे असे निवेदन देतील, येथून पुढे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा कर्डिले यांनी दिला आहे.
समितीचे अध्यक्ष विनित धसाळ यांनी सांगितले की, राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या झालेल्या बैठकीत ५३२ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. एकूण ८८० प्रकरणे दाखल झाली होती त्यापैकी ५३२ प्रकरणे मंजुर झालेली आहेत, ८५ प्रकरणे पूर्ततेवर तर २६३ प्रकरणे नामंजूर झाली आहेत. आत्तापर्यंत केवळ ६ बैठकीमध्ये एकूण १६२४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेचे काम सुरू असून वंचित लाभार्थ्यांनी समितीचे कोणत्याही सदस्यांकडे संपर्क साधावा पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, रविंद्र म्हसे,सरपंच सौ.सुवर्णा बानकर आदींनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here