राहुरी : आषाढी एकादशीनिमित्त ब्राम्हणीतील स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलकडून दरवर्षीप्रमाणे आषाढी वारी काढण्यात आली.
कपाळी गंध,डोक्यात टोपी,हाती झेंडा,गळ्यात टाळ घेत पांढरे शुभ्र वारकरी पोशाख परिधान केलेले मुले, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत नऊवारी साडी नेसलेल्या मुली बाल दिंडीत सहभागी झाल्या.अतिशय उत्साही वातावरणात व जल्लोषात टाळ मृदुंगच्या गजरात श्री विठ्ठल नामाचा जयघोष करत आकर्षक ‘रिंगण’ विद्यार्थ्यांनी सादर केले व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेझीम व नयनरम्य पावली,अभंग, अश्वाचे रिंगण सादर केले.
अश्वाच्या अंगावरील विठू माऊली नाव व विठ्ठल प्रतिमा सर्वाचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी श्री.विठ्ठल रुक्मिणी तसेच इतर संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती त्याबरोबरच संतांनी चालवलेली भिंत, पालख्या,पादुका, पैसखांब असा नयनरम्य देखावा सादर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी गावात विविध संतांची माहिती व अभंग सादर करून उत्कृष्ट कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. श्री विठ्ठल मंदिराजवळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी फुगड्या खेळून आपल्या आनंद व्यक्त केला.कार्यक्रमाच्या शेवटी महाआरती घेण्यात आली. दरवर्षी सुंदर आषाढी वारीचे नियोजन केले जात असल्याने मुलांना आपली आध्यात्मिक परंपरा जपत ते जोपासण्याचे धडे दिले जात असल्याने ग्रामस्थ व पालकांनी बानकर स्कूलच्या प्राचार्य अश्विनी बानकर व संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.
















