गणराज्य न्यूज नाशिक : निरीक्षण व बाल गृह, उंटवाडी येथून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन पीडित मुलीला शोधून काढण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ला मोठे यश आले आहे. अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या गुन्ह्यात पोलिसांनी चिकाटी, तांत्रिक कौशल्य आणि गुप्त माहितीच्या आधारे तब्बल २४ दिवसांनी या मुलीला जेजुरी येथून सुखरूप ताब्यात घेतले. या अतुलनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मा. श्री. संदिप कर्णिक यांनी संपूर्ण तपास पथकाचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. या यशस्वी कामगिरीमुळे नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या पथकातील राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे यांचाही समावेश असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
काय होती घटना?
दिनांक २६ जून २०२५ रोजी नाशिकच्या उंटवाडी येथील निरीक्षण व बाल गृहातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही मुलगी वावी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यातील पीडिता होती. तिच्या अपहरणाची तक्रार मिळताच मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २१९/२०२५) दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुलगी मिळून येत नसल्याने पोलीस दलावर मोठा ताण होता.
गुन्हे शाखेने स्वीकारले आव्हान
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस आयुक्त मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संदिप मिटके यांनी १२ जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ ला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ ने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
असा लागला शोध
गुन्हे शाखेच्या पथकाने सर्वप्रथम उंटवाडी येथील निरीक्षण गृहाला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. मुलगी कशी आणि कोणासोबत गेली, याचा कोणताही ठोस पुरावा फुटेजमधून मिळत नव्हता. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असताही निराशाच हाती लागत होती.
मात्र, पोलिसांनी हार न मानता अहोरात्र मेहनत सुरू ठेवली. तांत्रिक विश्लेषण, विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीची सांगड घालून तपास सुरू ठेवला. या अथक प्रयत्नांना अखेर यश आले. तपासात असे निष्पन्न झाले की, सदर मुलगी अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी, आळंदी आणि भीमाशंकर या तीर्थक्षेत्रांच्या परिसरात फिरत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा, युनिट-२ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर, पोलीस हवालदार प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे यांचे पथक तातडीने रवाना झाले. या पथकाने अत्यंत कुशलतेने शोधमोहीम राबवून दिनांक २० जुलै २०२५ रोजी या अल्पवयीन मुलीला जेजुरी येथे सुखरूप शोधून काढले. तिला विश्वासात घेऊन नाशिकला आणण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
कामगिरीचे सर्वत्र कौतुक
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल निरीक्षण व बाल गृहाचे मानद सचिव श्री. चंदुलालजी शहा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समिरा येवले, कार्यकारी मंडळ सदस्य श्री. हितेश शहा, मुलींच्या निरीक्षण गृहाच्या अधीक्षिका राधिका धोंडगे, परिविक्षा अधिकारी स्वाती म्हस्के, समुपदेशक पुजा आहेर, कार्यकारी मंडळ सदस्या ॲड. लिना शेख (अहिरे), जयश्री दोंदे तसेच सायक्लॉन ग्रुप दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष श्री. नतिंदर सिंग आणि सदस्य श्री. योगेश पाटील यांनी पोलीस आयुक्त आणि संपूर्ण तपास पथकाचे विशेष अभिनंदन करून आभार मानले.
या पथकाचा झाला सत्कार
मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करणाऱ्या संपूर्ण टीमचा सत्कार केला. यामध्ये गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेपोउनि मुक्तारखान पठाण, मसपोउनि भारती देवकर, पोहवा प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील आणि पोअं महेश खांडबहाले, तेजस मते, जितेंद्र वजीरे यांचा समावेश होता.
या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तांत्रिक विश्लेषण विभागातील सपोनि जया तारडे, सपोउनि जाकीर मिर्झा, पोअं. गणेश रूमाले, भुषण पवार, संदिप बर्डे, सुशिल देशमुख, योगेश वाजे, हर्षल महाले, अमोल टर्ले आणि गणेश पगार यांचेही यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.













