बाभळेश्वर : राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी पाटील म्हस्के यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व त्यांच्या कार्यावर आधारित शरदपर्व – सारथी अमृतरथ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन आज रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन व स्व. नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी असतील. रावसाहेब म्हस्के यांनी श्रीरामपूर दूध संघाचे संचालक म्हणून काम करताना संघाच्या आधुनिकीकरणासाठी मोठे योगदान दिले. ९५ लाखांचा निधी, आधुनिक इमारत, बर्फ कारखाना आणि पशुधन प्रयोगशाळा सुरू करून दुग्ध उद्योगाला बळ दिले. त्यांना राज्यस्तरीय दुग्धयोगी सन्मान मिळाला आहे.शशिकांत शिंदे, आ. दिलीप वळसे पाटील, रोहित पवार तसेच अनेक खासदार व आमदार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम राजकीय नसला तरी शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. बाभळेश्वर परिसरात या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.













