राहुरी – कृषी विभाग महाराष्ट्र शासनांतर्गत हॉर्टसॅप योजनेअंतर्गत डाळिंब फळपिकावरील कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर निश्चीत प्लॉटधारक शेतकरी यांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आज डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृह, पंचायत समिती राहुरी येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भारत दवंगे (डाळिंब कीड व रोग शास्त्रज्ञ) व श्री. संतोष पन्हाळे (डाळिंब प्रगतशील शेतकरी, सांगली) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डाळिंबातील महत्त्वाच्या रोग व किडींचे निदान, त्यावरील प्रभावी उपाययोजना तसेच शाश्वत उत्पादन व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेत पातळीवरील अनुभव तसेच तज्ज्ञांचे शास्त्रीय मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते असे श्री. बापुसाहेब शिंदे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास राहुरी तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय, राहुरी यांच्या वतीने करण्यात आले.













