राहुरी – बदलापूर येथील घटनेचा निषेध व आरोपीला फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी राहुरी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुकाप्रमुख सचिनराव म्हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा करून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
बदलापूर येथे आदर्श विद्यालयात चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याकडून अत्याचार करण्यात आला. मुलींनी घाबरून शाळेत जाणे बंद केल्याने हा प्रकार उघडकीस आला. दवाखान्यात तपासणी केल्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले सदर दवाखान्यातील सर्टिफिकेट घेऊन पालक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यावेळेस त्यांची जवळजवळ बारा तास दखल घेण्यात आली नाही. हा पोलीस अधिकाऱ्याचा मुजोरीपणा योग्य नाही. त्या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली पण सरकार त्यांच्या लाडक्या भाचीला संरक्षण देण्यात अपयशी आहे असे वाटते. सरकारने बहिणींच्या मुलांकरता संरक्षणाची चांगली काहीतरी भूमिका घ्यावी नाहीतर न्याय मिळवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. झालेल्या अत्याचार प्रकरणी लवकरात लवकर गुन्हेगारास कठोर शिक्षा व्हावी व पिडीतांना न्याय मिळावा अशी मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले .
















