सोनई : येथील पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने पाचेगाव (ता.नेवासा) येथील अपघातग्रस्त कुटुंबातील अपंग शिवाजी वाबळे यांच्या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विधायक उपक्रमाचे परीसरात स्वागत होत आहे.
पाचेगाव येथील वृत्तपत्र एजंट शिवाजी वाबळे यांचा अगोदरच डावा हात निकामी असताना मागील महिन्यात त्यांच्या वाहनास दुस-या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा उजवा हात व एका पायाला फ्रॅक्चर झाले होते. कुटुंब प्रमुख व कमावती व्यक्ती अंथरुणावर पडल्याने अपंग असलेली पत्नी ज्योती व तीन मुलींचे पुढे कसे होणार असा प्रश्न होता. वाबळे यांचे वर्गमित्रांनी ५१ हजार रुपये तर सोनई येथील आम्ही सोनईकर व्हाॅटसअप ग्रुपच्या माध्यमातून आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी जमा झालेले ५६ हजार रुपये परिवारास दिल्याने आधार मिळाला होता.
आनंदवन संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, सचिव संजय गर्जे व सदस्य किशोर घावटे यांनी वाबळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन यांच्या गायत्री व आरती या दोन मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. गायत्री सहावीत तर आरती इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे.त्यांना दोन शालेय गणवेश, बूट, स्कुल बॅग व शालेय साहित्य देण्यात आले. दोन्ही मुलींचे इयत्ता दहावीपर्यंत शैक्षणिक पालकत्व राहणार असून त्यांची गुणवत्ता पाहून संस्था पुढील निर्णय घेईल असे गर्जे यांनी सांगितले. पाचेगाव व परीसरातील ग्रामस्थांनी या विशेष योगदानाचे स्वागत केले आहे.
















