शिर्डी – “जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड झाला पाहिजे,” असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या २८ चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, “बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून, गुन्हेगार अद्ययावत शस्त्रांचा व इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. अशा गुन्ह्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किंवा उपोषणासारख्या बाबींना न घाबरता, सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “श्रीरामपूर येथील गोळीबार, विशेषतः देशविघातक कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनात जमणारा जमाव, या बाबी समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत. गुटखा व अवैध व्यवसायातून येणारा पैसा गुन्हेगारीला बळ देत असून, जिल्ह्यात वाढलेला अमली पदार्थांचा विळखा व बेकायदेशीर शस्त्रांचा वावर रोखणे अत्यंत गरजेचे आहे. जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी तसेच जनतेच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक यंत्रणा व साधनांची गरज असल्यास, जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ती तत्काळ उपलब्ध करून दिली जातील.”
”शासनाचा भर केवळ वाहने देण्यावर नसून पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी निवासस्थानांचा प्रश्न सोडविण्यावरही आहे. अहिल्यानगर शहरात ३२२ कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच, सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून, उपविभागीय स्तरावरही अत्याधुनिक ‘कमांड सेंटर’ उभारणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग व इतर राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास मदतीसाठी या नवीन वाहनांचा मोठा उपयोग होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक श्री.घार्गे म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई (२८,०००) वगळता राज्यात सर्वाधिक, म्हणजे वर्षाला सुमारे १७,००० गुन्हे घडतात. हे प्रमाण पुणे व नागपूर शहरांपेक्षाही अधिक आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार व शिर्डी, शनिशिंगणापूरसारखी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील. विशेषतः महिलांची सुरक्षितता व ‘११२’ क्रमांकावर येणाऱ्या आपत्कालीन कॉल्सना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या वाहनांमुळे मदत होईल. ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिना’निमित्त पोलीस दल जनसेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.”
जिल्ह्यात कोपरगाव व पाथर्डी येथील नवीन पोलीस ठाण्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून राहाता, नेवासा व राहुरी येथील कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच श्रीगोंदा व श्रीरामपूर येथील कामांना गती मिळाली असल्याने पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे, असेही श्री. घार्गे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतीश दिघे आदी उपस्थित होते.














