सोनई – शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बानकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा शनिरत्न पुरस्कार पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना देण्यात येणार आहे.अशी माहिती विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.
देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी के दरंदले व विश्वस्तांनी पंढरपूर येथे जाऊन औसेकर महाराज यांना निवडीचे पत्र दिले आहे.पंढरपूर संस्थानच्या माध्यमातून अध्यात्मिक व विकासात्मक कामाची दखल घेऊन पुरस्कार करीता निवड करण्यात आली. सन २००४ पासून पुरस्कार प्रदान कार्यक्रम सुरु केला असून यापुर्वी ओतुरकर महाराज,रविदास महाराज शिरसाठ,बद्रीनाथ महाराज तनपुरे, कालिचरणदास महाराज,उध्दव महाराज मंडलिक,उद्योजक बी व्यंकटेश राव आदींचा शनिरत्न पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे.
शनिजयंती सोहळ्यानिमित्त मंगळवार (ता.२७) रोजी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख व गोसावी महाराज उपस्थित राहणार आहेत.लेखक बापूराव गोसावी लिखित स्व. बानकर यांच्यावरील पुस्तकाचे यावेळी प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष विकास बानकर व विश्वस्तांनी केले आहे.
















